श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे काश्मीर कनेक्शन : महेश सेनानायके
कोलंबो: श्रीलंकेत झालेल्या बॉम्बहल्ल्याच्या तपासातून आता धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत. श्रीलंकेच्या सैन्यदल प्रमुखांनी दावा केला आहे की दि.२१ एप्रिल रोजी देशात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांनी भारतात येऊन काश्मीर चा दौरा केला होता. महेश सेनानायके पहिले सैन्याधिकारी आहेत ज्यांनी हल्ल्यांनंतर त्या संबंधी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सेनानायके म्हणाले की दहशतवाद्यांनी काश्मीर व्यतिरिक्त बंगळुरू आणि केरळ मधल्या काही भागात भेटी दिल्या होत्या.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सेनानायके म्हणाले की, “मला पूर्ण माहिती नाही की दहशतवाद्यांचा भारतात जाण्यामागचा हेतू काय होता. पण इतकं नक्की की ते प्रशिक्षण अथवा दुसऱ्या दहशतवादी संघटनांशी संपर्क करू इच्छित होते. या हल्ल्याची पूर्तता करण्याच्या पद्धतीवरून असं वाटतं की या दहशतवाद्यांनी हल्ल्याचे नियोजन बाहेरच्यांच्या मदतीने केलेलं असावं.”
श्रीलंकेत २१ एप्रिल रोजी ईस्टर संडे च्या दिवशी विविध भागात झालेल्या बॉम्बस्फोटांत जवळपास २५० लोक मृत्युमुखी पडली तर ५०० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले होते. यात जवळपास १० भारतीयांच्या बरोबरीने ३९ नागरिकही मृत्युमुखी पडले.
