विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला भाग
नवी दिल्ली, दि. ९: सरकार मणिपूरचं विभाजन करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत बोलताना केला. त्यांनी सरकारवर आणि सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडलं. मणिपूरमधल्या मदत शिबिराला दिलेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की मणिपूरमधे हिंसाचाराच्या काळात महिलांना अत्याचाराला सामोरं जावं लागलं. परिस्थिती गंभीर असताना ती पूर्ववत करण्यासाठी सरकार मणिपूरमध्ये लष्कर का तैनात करत नाही, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत मणिपूरला का भेट दिली नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. भाजपा देशहिताच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी बोलत असताना सभागृहात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. चर्चेत हस्तक्षेप करत महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याचं विभाजन झालं नाही, आणि कधीही होणार नाही. मात्र मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी असूनही काँग्रेसनं सभागृहात चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप इराणी यांनी केला. यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये महिलांवर अत्याचार होत असताना काँग्रेस मूक प्रेक्षक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
