‘बीएमसी’तील १२ हजार कोटींच्या कोविड घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पाथक पोहोचले महापालिका मुख्यालयात
मुंबई, दि. १८: कोरोनाच्या काळात बीएमसीच्या १२ हजार कोटींच्या विविध कामांबाबतचा कॅगचा अहवाल गेल्या सत्रात जाहीर करण्यात आला. या कामांमध्ये कथित अनियमितता आढळून आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात आली होती आणि आता हीच टीम आज अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कथित कोविड घोटाळ्याच्या प्रकरणी, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आज पालिका मुख्यालयात चौकशीसाठी पोहोचली आहे.
ईओडब्ल्यूचे अधिकारी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पोहोचले आहेत आणि बीएमसी अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. सध्या बीएमसीचे मुख्य विकास अभियंता सुनील राठोड यांच्या कार्यालयात एसआयटीचे पथक त्यांच्याकडून माहिती घेत आहे. संग्राम सिंह निशाणदार, (डीसीपी ईओडब्ल्यू) माध्यमांना म्हणाले, “मी या क्षणी कोणतेही तपशील सामायिक करू शकत नाही, मी एवढेच सांगेन की जो तपास सुरू आहे तो एसआयटी करत आहे. आमचा तपास सुरूच राहील.”
असे कळते की यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कॅगच्या अहवालासंदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणी शिवसेना शिंदे गट व भाजप यांनी शिवसेना ठाकरे गटाला ठेवलेच होते परंतु, आता बीएमसीच्या तपासाचे भूत उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसवरही बसू शकते, कारण २०१९ ते २०२२ या काळात राजेश टोपे हे राज्याचे आरोग्यमंत्री होते.
