पावसाळी कालावधीत रस्ते दुरूस्तीसाठी नवी मुंबई महापालिकेकडून विशेष मोहीम
नवी मुंबई, दि. ७: पावसाळी कालावधीपूर्वी नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या तीन बैठका घेऊन पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे तसेच पावसाळी कालावधीत आवश्यक दक्षता घेण्याचे व परस्पर समन्वय राखण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आयुक्तांनी भर पावसात नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा पाहणी दौराही केला होता. या दौ-यामध्ये काही ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत ही कामे त्वरित थांबविण्याचे व सदर रस्ते वाहतूकीसाठी खुले करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास दिले होते. त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीबाबतही तत्पर कार्यवाहीचे निर्देशित केले होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत रहावेत याकरिता नवी मुंबई महानगरपालिका आधीपासूनच दक्षतेने कार्यवाही करीत असून रस्ते दुरुस्तीचे वार्षिक देखभाल – दुरुस्ती कंत्राट करण्यात आले आहे व ते नियमितपणे सुरू आहे. त्यांच्यामार्फत रस्ते दुरूस्तीवर विशेष लक्ष दिले जात असून याकरिता विभागनिहाय ८ तसेच एमआयडीसी क्षेत्राकरिता २ अशा एकूण १० कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत नियमितपणे रस्ते पाहणी करून त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरिक तक्रार निवारण प्रणालीवर (Public Grievance System) तसेच विविध माध्यमांव्दारे प्राप्त होणा-या रस्त्याबाबतच्या तक्रारींवर त्वरित दुरुस्ती कार्यवाही करण्यात येत आहे. कंत्राटदारांमार्फत ४८ तासात दुरूस्ती कार्यवाही करण्यात न आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
पावसाळी कालावधीत रस्ते सुव्यवस्थित राहण्याबाबत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार अभियांत्रिकी विभागामार्फत विशेष दक्षता राखणेबाबत आठही विभागांचे कार्यकारी अभियंता व सर्व अभियंतावर्गास तसेच कंत्राटदारांस काटेकोर सूचना देण्यात आली असल्याची माहिती शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेने रस्त्यांच्या तक्रारीबाबत 8424948888 हा व्हॉट्स ॲप क्रमांक नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिलेला असून आपत्ती निवारण कक्षाचे टोल फ्री क्रमांक 1800222309/10 यावर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या तक्रार निवारण प्रणालीवरही (Public Grievance System) नागरिक रस्त्यांविषयीच्या तक्रारी व सूचना दाखल करु शकतात. पावसाळी कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेने विभागवार रस्ता दुरुस्ती पथके तयार केली असून पावसाळयाच्या अनुषंगाने कोल्ड मिक्सड अस्फाल्टचा रस्ते दुरुस्तीसाठी वापर करण्यात येत आहे.
नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने भरतीच्या कालावधीत अतिवृष्टी असल्यास शहरातील काही सखल भागात पाणी साचून राहते. याबाबत दक्षता बाळगत नवी मुंबई महानगरपालिका जलद पाणी निचरा होण्यासाठी पाणी उपसा पंप व इतर अनुषांगिक व्यवस्था करीत असून सखल भागात पाणी साचून राहिल्याने तेथील रस्त्यांच्या पृष्ठभागाचीही काही प्रमाणात हानी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापि या अनुषंगाने नागरिकांची कोणतीही गेरसोय होऊ नये याबाबत नवी मुंबई महानगरपालिका दक्ष असून रस्ते दुरुस्तीची कार्यवाही जलद करण्यावर भर देत आहे.
