केंद्रिय मंत्री रामदास आठवले म्हणतात बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी उलथापालथ होऊ शकते
मुंबई, दि. ३: महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर प्रत्येकजण आपापल्या परीने दावे-प्रतिदावे करत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजपचा मित्र पक्ष आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील. यासोबतच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना केंद्रिय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, असेही ते म्हणाले. सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा आहे हे विशेष.
केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, अजित पवार बराच काळ नाराज होते. तसेच बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजदसोबत जाण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे अनेक आमदार नाराज आहेत. जीतनराम मांझी हेही नितीश कुमार यांच्यासोबत होते पण तेही त्यांच्यापासून वेगळे झाले. जेडीयू आमदारांमध्येही नाराजीचे वातावरण असल्याचा दावा आठवले यांनी केला. त्यामुळे जेडीयूचे काही आमदार मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्षातून बाहेर येऊ शकतात. अशा स्थितीत बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी उलथापालथ होऊ शकते. त्याचप्रमाणे यूपीमध्येही जयंत चौधरीसारखे नेते भविष्यात एनडीएला मजबूत करण्याचा प्रयत्न करू शकतात. भविष्यात अनेक नेते आमच्यात सामील होऊ शकतात असा आठवले यांनी दावा केला.
