मला आंबे खूप आवडतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली मुलाखत सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या मुलाखतीत मोदींनी काही नव्या गोष्टींबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. अक्षय कुमारने मोदींची पहिली अराजकीय मुलाखत घेतली. या मुलाखतीत मोदींच्या जीवनातील अनेक अज्ञात पैलू समोर आले आहेत.
तरुणपणी मला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. लहानपणापासून मला वाचनाची आवड होती, असे त्यांनी सांगितले. मी कधी पंतप्रधान होईन असे वाटलेही नव्हते. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो असून माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता मला एखादी नोकरी मिळाली असती आणि माझ्या आईने गावात गोड वाटले असते, असे मोदींनी सांगितले.
अक्षयने मोदींना वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलं असता मला आंबे खूप आवडतात असंही त्यांनी सांगितलं. लहानपणी शेतातील पिकलेले आंबे आपण झाडावरून तोडून खायचो असंही मोदींनी सांगितलं आहे. या मुलाखतीत आपल्या स्वभावाबद्दल, कुटुंबाशी असलेल्या नातेसंबंधांबद्दल, एकटं राहण्याबद्दलही अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. मोदींच्या विनोदी स्वभावाची झलक या मुलाखतीत पाहायला मिळाली आहे.
या मुलाखतीत अक्षयकुमारने मोदींना “तुम्हाला राग येतो का” असा प्रश्न विचारला. यावर मोदी म्हणाले, मी बरीच वर्ष मुख्यमंत्री होतो, पण मला राग व्यक्त करण्याची संधीच मिळाली नाही, मी कडक शिस्तीचा माणूस आहे, पण मी कधी कोणाचा अपमान केला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मी आधी राग आल्यावर एकांतात कागद घेऊन बसायचो. मी त्यावर संपूर्ण घटनाक्रम लिहून बघायचो. जोपर्यंत मनाला शांती मिळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा घटनाक्रम लिहून काढायचो, असेही त्यांनी सांगितले.
‘मी अनेकदा पाहिलयं की तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असं का?’, असा प्रश्न अक्षयने मोदींनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी मी अशाप्रकारे घड्याळ घालण्यामागे एक विशेष असे कारण आहे. ‘मी अनेकदा बैठकींमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिले तर तो त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटू शकते. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घातलो कारण वेळ बघायचा झाल्यास मला लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहता येते,’ असं स्पष्टीकरण मोदींनी दिले.
