“मतदारांनो दोनदा मतदान करा” भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंविरोधात गुन्हा दाखल
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे अनुक्रमे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वजण आप आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. यातच भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारांना अजब सल्ला दिला आहे.
कोपरखैरणे येथे आयोजित केलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या सभेत बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारांना अगोदर २३ एप्रिल रोजी साताऱ्यात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, असे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभेत एकच खळबळ उडाली. याविरोधात मंदा म्हात्रे यांच्यावर निवडणक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदा म्हात्रे यांना आपली चूक लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील असाच सल्ला यापूर्वी दिला होता असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. म्हात्रेंच्या या विधानाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऐरोली विभागाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
