विकास कामांना स्थगिती दिल्यामुळे विधिमंडळात गदारोळ
नागपुर, दि. २०: विधानसभेत आज कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, विकास कामांच्या स्थगितीप्रकरणी सरकारला जाब विचारला. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात अर्थसंकल्पात दोन्ही सभागृहात मंजूर झालेली, व्हाईट बुकमध्ये आलेली विकासकामं, शिंदे-फडनवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी थांबवली. ही कामं सुरु व्हावीत म्हणून आम्ही लोकशाही मार्गानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली. मात्र केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांची कामं थांबवली आहेत. हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. ही कामं कर्नाटक किंवा गुजरातमधली आहेत का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी हौद्यात उतरुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज ४ वेळा तहकूब करावं लागलं.
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यानी ७० टक्के कामांवरची स्थगिती उठवली असल्याचं सांगितलं. मात्र काही कामं नियमबाह्य पध्दतीनं, तरतूद नसताना घेतली आहेत. ती तातडीची असतील तर त्यावर चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले, आधीचं सरकारदेखील विरोधकांवर अन्याय करत कामं रद्द करत होतं. पण आम्ही तसं करत नाही, असं फडनवीस म्हणाले. मात्र त्यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही. गदारोळ सुरुच राहिला. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर, विरोधी पक्षनेत्यांची – गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यानंतर कामकाज सुरळीत झालं. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक पुण्यातल्या भिडे वाड्यात करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊन, या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. छगन भुजबळ यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता.
Source – AIR
