नरेंद्र मोदी आईला भेटायला जाताना, मीडिया ला घेऊन का जातात? – राज ठाकरे
मुंबई: आज दादर येथील शिवाजी पार्क वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी पंतप्रधान मोदी व भाजप यांच्यावरच आपल्या भाषणात टीका केली. याच वेळी पंतप्रधानांवर मार्मिक टीका करताना ते म्हणाले, “मला कोणाच्या खाजगी आयुष्यात जायचं नाही पण नरेंद्र मोदी वर्षातून एकदा आईला भेटायला जातात त्यावेळी मीडियाला घेऊन का जायचं? नोटबंदीच्या वेळेला स्वतःच्या आईला रांगेत उभं केलं. भावनिक राजकारण करायचं म्हणून कुठल्या थरापर्यंत जाणार तुम्ही? ह्यातून मोदींचा दृष्टिकोन कळतो”
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :
“मोदी आणि शाह मुक्त भारत व्हावा म्हणून निवडणूक न लढवता मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला”
“देश संकटातून काढायचा असेल तर त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो, मी म्हणून सांगतो आत्ता जो निर्णय घेतलाय तो विधानसभेला पण लागू आहे असं अजिबात नाही.”
“नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्याच्या आधी ज्याला ज्याला विरोध केला त्या त्या गोष्टी त्यांनी सत्तेत राबवल्या.”
“नोटबंदीमुळे ४ कोटी नोकऱ्या गेल्या, शेकडो लोकं रांगेत मृत्यमुखी पडली, पण माध्यमांवर दबाव टाकून त्यांना ह्या सगळ्या बातम्या दडपायला लावत आहेत. ही भीषण परिस्थिती आहे सध्या.”
“मी काही वर्षांपूर्वी बोललो होतो की नरेंद्र मोदी निवडणुका जिंकण्यासाठी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. तेच त्यांनी केलं.”
“नरेंद्र मोदी नवाज शरीफांना भेटायला, केक भरवायला गेले, आणि त्यानंतर लगेच पठाणकोट हल्ला झाला, उरी झालं.”
“देशद्रोही कल्पना एडॉल्फ हिटलरची, तो देखील त्याला विरोध करणाऱ्याला प्रत्येकाला देशद्रोही ठरवायचा. हेच मोदी करत आहेत. ही हिटलरची पुनरावृत्ती आहे.”
