मुंबई-गोवा महामार्गावरचे खड्डे एका आठवड्यात बुजवण्याचे राज्य सरकारकडून आश्वासन
मुंबई, दि. १८ : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी मुंबई – गोवा महामार्गावरचे खड्डे आठवडाभरात बुजवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या विषयावर शिवसेना पक्ष प्रतोद आ. सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर चर्चेदरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. येत्या ३-४ दिवसात या रस्त्याचा पाहणी दौरा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई-गोवा महामार्गाचं काम पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करू आणि परशुराम घाटातल्या रस्त्याची समस्या पुढच्या वर्षीच्या मे पर्यंत दूर करु असंही ते म्हणाले.
विधानसभेत आज जीएसटी सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली. आता या दुरूस्तीमुळे कलम ४१ मध्ये बदल करून अंतिम करच आकारला जाईल, परतावा मिळेपर्यंत कर लागणार नाही, परतावा मिळण्यासाठी सरसकट दोन वर्षांची वेळ अंतिम केली आहे, असं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेनं पॅकिंग केलेल्या वस्तूंवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं विरोधकांनी याप्रकरणी सरकारला दोष देऊ नये, असंही ते म्हणाले. परिचारिकांच्या वेतनासाठी किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागाला दिले जातील अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. याबाबतचा प्रश्न आ. कुणाल पाटील यांनी उपस्थित केला होता. राज्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी प्रभावी मोहीम राबवण्यात येत आहे, रोग प्रतिबंधक डोस आणि गोळ्या देण्यात येत आहेत अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. मात्र सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सर्व उत्तरे देता न आल्याने विरोधी पक्षाच्या मागणीनंतर अध्यक्षांनी हा प्रश्न राखून ठेवला.
राज्यातलं रुबी हॉल, ज्युपिटर, इनामदार हॉस्पिटल आदी ठिकाणी अवैध किडनी प्रत्यारोपण कारवाया सुरू असल्या प्रकरणी संचालक, वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत चौकशी सुरू आहे. त्यात रुग्णालय प्रशासन दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करू अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं. बीड जिल्ह्यात अंबेजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या अवैध व्यवसाय प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षक दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा विधानसभेतले काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. यावर विरोधी पक्षाच्या प्रस्तावात चर्चा करा असं अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
पालघर जिल्ह्यात दोन अर्भकांचा झालेला मृत्यू, दुर्गम भागात नसलेले रस्ते हे मुद्दे विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित केले, यावर शासनाने निवेदन करावं असे निर्देश अध्यक्षांनी दिले. शासन अशा घटनांवर गंभीर आहे, आदिवासी भागात असे मृत्यू होणार नाही, दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले.