विधवा प्रथा बंदी मोहिमेमध्ये राज्यता सिंधुदुर्ग जिल्ह्याची आघाडी
सिंधुदुर्ग, दि. २४ : समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याच्या मोहिमेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यानं आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातल्या ४३१ पैकी ३१९ ग्रामपंचायतींनी अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव घेतले आहेत. उर्वरित सर्व ग्रामपंचायतींनी ठराव घेतल्यास अनिष्ट प्रथा बंद करण्याचे ठराव घेणारा सिंधुदुर्ग राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरवाड ग्रामपंचायतीनं अनिष्ट विधवा प्रथा बंदचा ठराव घेतल्यानंतर राज्य शासनानं त्याची दखल घेत अनिष्ट प्रथा बंद करण्याचा शासन निर्णयच घेतला. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ प्रजित नायर यांनी विधवा प्रथा बंद करण्याची मोहीम गावागावात राबवल्यामुळे लवकरच उर्वरित सर्व ग्रामपंचायती ठराव घेतील आणि सिंधुदुर्ग जिल्हा या अनिष्ट प्रथा निर्मुलनात राज्यात नक्कीच आघाडी घेईल.
