जाणून घ्या नेमकं कशा प्रकारे ही प्रणाली काम करते
रत्नागिरी, दि.८: कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना जिल्ह्यातल्या आपत्तीविषयीची माहिती देणारी राज्यातली पहिली चॅटबॉट प्रणाली रत्नागिरीत सुरू झाली आहे. जिल्ह्याच्या पालक सचिव विनीता वेद सिंघल यांनी काल या प्रणालीचं उद्घाटन केलं. पावसाळा सुरू झाल्यानं ठिकठिकाणी नैसर्गिक आपत्ती येतात.
अशा आपत्तीच्या वेळी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली असली, तरी फोनमधला व्यत्यय किंवा फोन व्यस्त असल्यानं माहिती मिळत नाही. अशा परिस्थितीत मोबाइलवर आधारित असलेली चॅटबॉट प्रणाली काम करते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या या सेवेसाठी ७३ ८७ ४९ २१ ५६ हा मोबाइल क्रमांक दिला आहे. हा क्रमांक पुन्हा एकदा ऐका – ७३ ८७ ४९ २१ ५६. या क्रमांकावर व्हॉटसॲपच्या माध्यमातून मेसेज पाठवायचा आणि त्यात उपलब्ध असलेल्या नऊ पर्यायांपैकी आपल्याला आवश्यक असलेल्या माहितीचा पर्याय निवडायचा. तो पाठविताच कोणाही नागरिकाला पाऊस, नद्यांच्या पाण्याची पातळी, वेधशाळेतर्फे जारी करण्यात आलेल्या सूचना, रस्ते आणि वाहतुकीची स्थिती, समुद्राच्या भरतीच्या वेळा, तसंच वेळोवेळी जारी केलेले महत्त्वाचे संदेश तत्काळ मिळणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासह जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनाही तो खूपच उपयुक्त ठरणार आहे.
