मुंबईप्रमाणेच गोव्यातील भूमिपुत्रांवरही होतोय अन्याय
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड हँडलिंग ऑपरेशनचे काम करणाऱ्या चारशेहून अधिक कामगारांना स्पाईस जेट लिमिटेड SpiceJet Limited या कंपनीने कामावरून कमी केले आणि त्यांच्या जागी १ जानेवारी २०२२ पासून सेलेबिनास एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड CelebiNas Airport Services Pvt Ltd या कंत्राटदाराकडून या कंपनीने नवीन कामगार नेमले. या प्रकरणी केंद्र सरकारच्या औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल दिला होता. ज्याला स्पाईस जेट SpiceJet लिमिटेड ने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले व तेथेही त्यांच्या पदरी निराशा आली. या संदर्भात वृत्त प्रसारित झाल्यांनंतर थेट गोव्यातून एक धक्कादायक माहिती महाराष्ट्रवार्ताच्या हाती लागली.
स्पाईसजेट लिमिटेड कंपनीने गोवा विमानतळावर काम करणाऱ्या आणि भारतीय कामगार सेनेचे सभासद असणाऱ्या सुमारे ७८ कामगारांना १ जानेवारी पासून मुंबई प्रमाणेच काम नाकारले आणि त्यांचे काम बर्ड वर्ल्ड वाईड फ्लाईट सर्व्हिसेस Bird Worldwide Flight Services India Pvt Ltd या कंत्राटदाराला दिले. या ठिकाणी कंपनीने सेनेच्या पुढाऱ्यांशी ‘वाटाघाटी’? केल्या अशी जोरदार चर्चा आहे. या सार्या प्रकारानंतर कामगारांत आता संतापाची लाट पसरली असून तेही आता मुंबईतील कामगारांप्रमाणे न्यायालयीन लढ्यासाठी पुढे आले आहेत.
मुंबई प्रमाणे या ठिकाणीही अन्याय झालेल्या कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी येथील भारतीय कामगार सेनेच्या एका नेत्याने छुपेपणाने या कंपनीच्या कामगारहितविरोधी कृतीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या शिवसेनेला मुंबई काय किंवा गोवा काय आपली शक्ती पणाला लावून कामगारांसाठी विधायक भूमिका घेत न्याय मिळवून देणे काही मोठी बाब नाही.
आज केंद्रात शिवसेनेचे २१ खासदार असून या साऱ्यांनी येत्या अधिवेशनात आवाज उठवला, केंद्रीय कामगार मंत्रालयाचे लक्ष वेधले तर कामगारांना न्याय मिळणे सोप्पे होईल. आज शिवसेना सोबत नाही म्हणून मुंबईतील स्पाईसजेट कामगारांचा लढा काही थांबलेला नाही. त्यांनी स्वतःची संघटना स्थापन करत एक-एक पाऊल यशाच्या दिशेने टाकण्यास सुरूच ठेवले आहे. परंतू, ही सारी प्रक्रिया खर्चिक असून वेळखाऊही आहे परंतू शेवटी विजय सत्याचाच होईल. शिवसेना नेतृत्वाने मनात आणले तर मुंबई काय आणि काय गोवा दोन्ही ठिकाणी स्पाईस जेटवर दबाव आणून कामगारांना न्याय मिळवून देणे शक्य आहे. परंतू, भारतीय कामगार सेनेवर वेटोळा मारून बसलेल्या अजगरांनी आता आपल्याच संघटनेला गिळून टाकत शेवटचे आचके देण्याचेच उद्योग चालवले आहेत. गोव्यातील स्पाईस जेट कामगारांसोबत घडलेला प्रकार याला नक्कीच दुजोरा देतो. परंतू, गोवेकर स्पाईस जेट कामगारांच्या डोळ्यांवरचे झापड आता उघडले आहे. तेही आता मैदानात उतरून संकटाशी दोन हात करण्यासाठी सज्ज होत आहेत.
या विषयाशी संबंधित इतर बातम्याही अवश्य वाचा
अखेर स्पाईस जेट कंपनीतील ४६३ कामगारांनी मिळविला न्याय, परंतू …. वाचा संपूर्ण विश्लेषण
