ओमायक्रॉन बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्र्वभूमीवर केरळमध्ये आज रात्रीपासून जमावबंदी(Curfew) लागू
महाराष्ट्रात काल ३ हजार ९०० नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर १ हजार ३०६ कोरोना रुग्ण बरे झाले. कोविड-१९ मुळे राज्यात काल २० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात काल ८५ ओमीक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळून आले. यापैकी ४७ रुग्णांचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर ३८ रुग्णांचा अहवाल भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेनं दिला आहे.
ओमीक्रॉनची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्याच्या गृह विभागाने नववर्ष स्वागतासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचं स्वागत घरीच साधेपणाने साजरं करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यात २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी यापूर्वीच घालण्यात आली आहे.
