ओबीसी आरक्षण देण्याची भाजपची इच्छा नसल्याचा पत्रकारांशी संवाद साधताना केला आरोप
मुंबई, दि.५: आज विधानसभेत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव व भाजप सदस्यांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात पाठपुरावा करण्याबाबतचा विधानसभेत प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडल्यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील व इतर भाजप आमदारांनी नियमावर बोट ठेवत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
या प्रसंगी भाजप आमदार वेल मध्ये उतरले व त्यांनी तालिका अध्यक्षांचा माईक ओढण्याचा प्रयत्न केला. अखेर भास्कर जाधव यांनी १० मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. यानंतर उपाध्यक्षांच्या दालनात जाधवांसमोर विरोधीपक्षनेते व भाजप आमदारांनी पुन्हा गोंधळ घातला. या प्रसंगी काही आमदार आपल्यावर धावून आले व त्यांनी आपल्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला. अखेर संसदीय कामकाज मंत्री ऍड. अनिल परब यांनी ऍड. आशिष शेलार व गिरीश महाजनांसह भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला व भास्कर जाधव यांनी त्याची तात्काळ अंमलबजावणी केली. या आधीही अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात करणाऱ्या विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर त्यांची तोफ धडाडली होती. यावेळी आपला नेता कोंडीत अडकलेला असताना सेनेचे इतर नेते बॅकफुटवर गेलेले पाहायला मिळाले.
कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील आमदार भास्कर जाधव हे हाडाचे कट्टर शिवसैनिक. आपल्या आक्रमक वक्तृत्वशैलीसाठी ते ओळखले जातात. मधल्याकाळात शिवसेनेतल्या पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांनी बंडाळी करत राष्ट्रवादी ची वाट धरली व आधी आमदार होत नंतर राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. दरम्यान २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत घरवापसी करत पुन्हा एकदा आमदारकीवर मोहोर उमटवली. या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर ‘पवारांच्या’ पॉवर मुळे जाधवांचं मंत्रिपद हुकलं. परंतू, काही महिन्यांपूर्वी त्यांची पक्षप्रवक्तेपदी वर्णी लावत याची भरपाई पक्षाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
आजही विधानसभा बरखास्त झाल्यावर आ. भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर घणाघाती टीका करत काही लोकांना ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाहीये असा भाजपवर आरोप केला.
