राज्यातील ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी निधीची तरतूद
जलजीवन अभियानांतर्गत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला ७ हजार कोटींहून अधिक रुपये मंजूर केले आहेत. २०२४ पर्यंत ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी राज्याला सर्वप्रकारे मदत करण्याचं आश्वासन जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल दिलं. या अभियानाला २०१९ मध्ये सुरुवात झाली त्यावेळी, देशात ग्रामीण भागातल्या एकूण १९ कोटी २० लाख घरांपैकी केवळ ३ कोटी २३ लाख घरांना नळजोडणी केलेली होती.
मात्र, गेल्या २१ महिन्यांमध्ये कोरोना संसर्गाची स्थिती असतानाही ४ कोटी २७ लाख घरांना नळजोड पुरवण्यात आल्याचं शेखावत यांनी सांगितलं. महाराष्ट्रात, ग्रामीण भागातल्या १४२ लाख घरांपैकी जवळपास ९१ लाख घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा होतो. अभियानाच्या सुरुवातीला यापैकी केवळ ४८ घरांना नळाद्वारे पाणी मिळत होते. गेल्या २१ महिन्यांमध्ये राज्यात ४३ लाख घरांना नळजोडणी देण्यात आली.
