विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यानं हिंदू समाजाबद्दल केलेलं वक्तव्य गंभीर, अवमानजनक, आणि आक्षेपार्ह असून, त्यावर राज्य सरकारनं तातडीनं कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
शरजील उस्मानी याने पुणे येथे दि. 30 जानेवारी 2021 रोजी एल्गार परिषदेत समस्त हिंदू समाजाबद्दल केलेले अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्य आणि त्याच्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करण्याची गरज, याबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र @CMOMaharashtra pic.twitter.com/a0jNk6FEq0
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 2, 2021
कुणीही यावं आणि अशी विधानं करून वातावरण खराब करावं, आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. राज्याची चिंता वाढवणारा आणि सर्वांच्या माना शरमेनं खाली घालायला लावणारा आहे. हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, अशी आशा फडणवीस यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
