आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
गुवाहाटी : यावर्षी एप्रिल मध्ये होत असलेल्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा देण्याचा निर्णय आज गुवाहाटी येथे झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत आसाम मध्ये भाजप सोबत आरपीआय ची युती करण्यात येणार असून त्यासाठी रिपब्लिकन पक्षाला ५ ते १० जागा सोडण्यात याव्यात अशी रिपाइं ची मागणी असून त्यासाठी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आपण लवकरच भेट घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले दिली आहे.
आसाम मध्ये दलित आणि अल्पसंख्यांक समाज मोठया प्रमाणात रिपब्लिकन पक्षासोबत आहे. त्यामुळे भाजप रिपाइं युती आसाम विधानसभा निवडणुकीत झाल्यास त्याचा भाजप ला निश्चित लाभ होईल. रिपाइं आसाममध्ये ५ ते १० जागा सोडल्यास रिपाइं भाजप युती चा मोठा विजय आसाम विधानसभा निवडणुकीत होईल. मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल यांच्या नेतृत्वात आसाम मध्ये पुन्हा भाजप विजयी होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. यावेळी रिपाइं चे विनोद निकाळजे, हितेश देवरी, महेश कुमार, नथुनिदास आदी मान्यवर उपस्थित होते.
आसाम सह संपूर्ण ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्ष आपण मजबूत करणार आहोत. भारत सरकार च्या विविध लाभकारी योजना ईशान्य भारतात पोहोचविण्यासाठी आपण ईशान्य भारताचा दौरा करणार आहोत. आज दि. ११ जानेवारी रोजी आगरतळा येथे मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल यांच्या सोबत जाहीर सभेला केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले संबोधित करणार आहेत. तसेच लवकरच आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल यांच्या सोबत रामदास आठवले यांची भेट होणार असल्याचे रिपाइं तर्फे कळविण्यात आले आहे.
