“पक्षसदस्य नोंदणी करणार नाही त्यांना रिपब्लिकन पक्षात स्थान मिळणार नाही” – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा पक्षसंघटनेच्या बांधणीसाठी राज्यव्यापी दौरा सुरू
मुंबई – रिपब्लिकन पक्षाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा लाभला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्षात सर्व जाती धर्माचे लोक पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची सदस्य नोंदणी शिस्तीत आणि गांभीर्यपूर्वक करावी.
येत्या दि १० जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेऊन निवडणूक आयोगाला अहवाल देण्यात येणार आहे. त्यामुळे दि १० जानेवारी पूर्वी सदस्य नोंदणी कार्यकर्त्यांनी पूर्ण करावी. पक्षसदस्य नोंदणी जे कार्यकर्ते करणार नाहीत त्यांना पक्षसंघटनेत स्थान मिळणार नाही असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.
मुंबईत भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित रिपाइं मुंबई प्रदेश च्या बैठकीत रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. मागील २०१२ च्या मुंबई मनपा निवडणुकीत रिपाइं चा केवळ १ नगरसेवक निवडून आला तर २०१७ च्या मुंबई मनपा निवडणुकीत रिपाइं चा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आणून पक्षाची ताकद दाखविली पाहिजे. त्यासाठी आताच मागासवर्गीयांची, मुस्लिमांची, हिंदी भाषिकांच्या, दक्षिण भारतीयांच्या वस्त्यां अधिक असणाऱ्या वॉर्डची निवड करा. मुंबईतील किमान ५५ जागा निवडून त्यावर भर द्या. त्यातील किमान ३५ जागा रिपाइं तर्फे निश्चित आपण जिंकू शकू अशी वर्षभरात तयारी करावी असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या अर्धांगिनी सीमाताई आठवले यांनी कोरोनावर मात करून आल्याबद्दल कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. कोरोना वर जशी मात केली तशी आगामी निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेने वर रिपब्लिकन पक्षाने मात करावी असे आवाहन रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर यांनी केले. मुंबई महापालिकेवर भाजप चा महापौर तर आरपीआय चा उपमहापौर निवडून येईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले. यावेळी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे पुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
