अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू
अंबरनाथ : आपल्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेतील कार्यालयीन कर्मचारी व सफाई कर्मचारी हे २५ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजल्यापासून कामबंद आंदोलनास बसले आहेत.
वेळेवर पुरवणी पगार न काढणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अकाली निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्वरीत कामावर रुजू करावे, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे मेडिक्लेमचे पैसे त्वरीत मंजूर करावे, १५ ते १८ वर्षांपासून सेवानिवृत्त व निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना १२ वर्षाचा कालबध्द पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, हक्काची सुट्टी असताना सुद्धा ती देण्यात येत नाही सुट्टी न दिल्यास त्याबदल्यात आर्थिक सहाय्य करावे, ओव्हर टाईमचा पगार देण्यात यावा, मुकादम हे सेवाज्येष्ठतेनुसार व अनुभवाच्या वर्षानुसार ठरवण्यात यावे, कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा निर्माण करून द्याव्यात तसेच लवकरच सातवा वेतन आयोग शासन निर्णयानुसारच लागू करण्यात यावा या आपल्या प्रमुख मागण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेतील द्वितीय व तृतीय क्षेणीतील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे.
सरकारला निवेदन देऊन १ महिना होत आला असून आपल्या प्रलंबीत मांगण्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने आपण कामबंद आंदोलन करत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच बेमुदत कामबंद आंदोलनाच्या वेळी काही चुकीचा प्रकार घडल्यास त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असे मनसे तर्फे बजावण्यात आले. जवळपास ७५० कामगार व तृतीयश्रेणी कर्मचारी ह्या कामबंद आंदोलनात सहभागी झालेत. त्यामुळे जर हे आंदोलन अजून चिघळले तर अंबरनाथकर मेटाकुटीस येतील इतकं नक्की.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना, अंबरनाथ युनिट अध्यक्ष सूर्यकांत अनार्थे, कार्याध्यक्ष धनंजय गुरव, सरचिटणीस समीर मयेकर यांनी सर्व कामगारांना मार्गदर्शन केले.

