स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार तर नवी मुंबईचा देशात तिसरा क्रमांक
नवी मुंबई दि.२० : नागरी स्वछता अभियानातल्या कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्रानं यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये, देशात सर्वाधिक पुरस्कार मिळवून आपली घोडदौड कायम राखली आहे. मोठ्या राज्यांच्या मानांकनात, महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. नागरी स्वच्छता अभियानातल्या राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३, असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. नगर विकास मंत्री एकनाश शिंदे यांनी आज ही माहिती दिली. देशातलं सर्वाधिक स्वच्छ शहर या श्रेणीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार राज्यातल्या नवी मुंबई शहराला मिळाला आहे. विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये, तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातल्या शहरांनी मिळवले आहेत. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, दुसरा सासवड तर तिसरा क्रमांक लोणावळा शहरानं मिळवला आहे.
पश्चिम विभाग गटात, २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा शहराला स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. याच गटात, शाश्वत स्वच्छता शहर म्हणून जेजुरीला पुरस्कार मिळाला आहे.
२५ ते ५० हजार या लोकसंख्येच्या श्रेणीत शिर्डीला स्वच्छ शहर म्हणून तर शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे. ५० हजार ते एक लाख लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये शाश्वत स्वच्छ शहर म्हणून बल्लारपूरचा गौरव केला असून नागरिकांनी दिलेला उत्कृष्ट प्रतिसाद या श्रेणीत हिंगोली शहराला पुरस्कार मिळाला आहे.
