विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू, अनेक मुद्द्यांवरुन अधिवेशन गाजण्याची शक्यता
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ, नोकरभरती, मुंबईचा विकास आराखडा आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप यावरून अधिवेशनात सरकारची कोंडी केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या एक आठवड्याच्या अधिवेशनात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार अधिवेशनाचा उपयोग करण्याची शक्यता असून राज्याच्या अर्थसंकल्पात केंद्राप्रमाणेच घोषणांची पुनरावृत्ती केली जाईल, अशी शक्यता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका केली. चहापान हे कोणत्याही
गोष्टीच सेलिब्रेशन नाही तर सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचं व्यासपीठ आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असले तरी त्यात पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही. २७ फेब्रुवारीला केवळ लेखानुदान सादर होईल. २८ फेब्रुवारीला चर्चा होईल. लेख लेखानुदानात नवीन योजनांचा समावेश नसून एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या आवश्यक खर्चाची तरतूद त्यात असेल. पूर्ण अर्थसंकल्प जूनच्या अधिवेशनात मांडण्यात येईल. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने सोमवारी अधिवेशनाला सुरुवात होईल. मात्र अभिभाषणावर या अधिवेशनात चर्चा होणार नाही. पुरवणी मागण्या पहिल्याच दिवशी सादर होतील आणि २६ तारखेला त्यावर चर्चा होईल. याव्यतिरिक्त शासकीय विधेयके व इतर शासकीय कामकाज असणार आहे.
विरोधकांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक उत्तरे देईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
