मनसेने मुख्यमंत्र्यांकडे केली यु.ए.ई. येथे अडकलेल्या मराठी कुटुंबांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती मध्ये अडकलेल्या मराठी कुटुंबांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. संयुक्त अरब अमिराती मध्ये अडकलेले जवळपास १००० पेक्षा जास्त मराठी नागरिक देशात येण्यासाठी आतुर असल्याचे व त्यात ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांचाही समावेश असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
आपल्या पत्रात सरदेसाई म्हणाले की संकटाच्या या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून उत्पन्नाचे कुठलेही सध्या दुबईवरून महाराष्ट्रात येण्यासाठी “वंदे भारत” योजनेअंतर्गत कुठलीही थेट हवाई सेवा नाही. अनेकांनी भारतीय दूतावासाशी ई-मेल द्वारे संपर्क केला असता “कृपया धीर धरा, काही माहिती मिळाल्यास आम्ही लगेच कळवू” अशी साचेबद्ध उत्तरे मिळत आहेत. त्याचबरोबर काही जणांचा फोनवर संपर्क झाला असता, त्यांना मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही राज्यात परतण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्यास संबंधित राज्य सरकारच्या गृह खात्याकडून परवानगी मिळणे आवश्यक आहे. अशी परवानगी मिळाल्यानंतरच त्या राज्यासाठी विदेश मंत्रालयाकडून व हवाई उड्डाण मंत्रालयाकडून विमानसेवा पुरवली जाऊ शकेल असे सांगण्यात आले. हे जर खरे असेल तर महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याने तशी मागणी केंद्र सरकारकडे का केली नाही? इतर राज्यातील नागरिकांची तेथून परतण्याची व्यवस्था होत असताना फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना परत येण्यासाठी एकही विमानाची व्यवस्था का होऊ शकत नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे तात्काळ मिळणे आवश्यक आहे.”
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती मध्ये अडकलेल्या मराठी कुटुंबांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली… pic.twitter.com/QCgviQkNCV
— Nitin Sardesai (@1nitinsardesai) May 21, 2020
