कर्नाटकला पायी चालत जाणाऱ्या मजुरांसाठी खोपोली पोलीस ठरले देवदूत
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने देशात संचारबंदी लागू केली असून विविध क्षेत्रातील मजुरांचे रोजगाराचे साधन बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी परप्रांतीय मजूर आपल्या गावी पायी जाण्याचा मार्ग अवलंबित आहेत. अन्नपाण्याविना गावाकडे जाण्याचा ओढीने स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. अशा मजुरांना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांच्या गावी पाठविण्याबाबत पुढाकार घेण्यासाठी पोलिस अधीक्षक रायगड अनिल पारसकर यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक ५-५-२०२० रोजी असेच कर्नाटकला पायी चालत जाणाऱ्या मजुरांना अमृतांजन ब्रिज येथे लोणावळा पोलिसांनी अडवून खोपोली पोलिसांच्या ताब्यात दिले होते. खोपोली पोलिसांनी तत्परतेने त्यांना कोणालाही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याची खबरदारी घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांची विचारपूस केली असता ते वसई-विरार डोंबिवली टिटवाळा व कल्याण येथून तीन दिवसांपूर्वी निघाले होते असे कळले. ३१ महिला व पुरुष तसेच १४ लहान मुले चालत तिथपर्यंत पर्यंत पोहोचले होते. खोपोली पोलिसांनी त्यांचे हाल पाहून त्यांची वैद्यकीय तपासणी करून सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवणाची व राहण्याची सोय केली. त्यांनी खोपोलीतील ग्रामस्थ आणि महसूल विभागाच्या मदतीने त्यांना खाजगी बस उपलब्ध करून दिली. तसेच कर्नाटकातील प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना दिनांक ७-०५-२०२० रोजी कर्नाटकातील गुलबर्गा येथील त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आस्वार, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग, पोलीस उपनिरीक्षक जावेद मुल्ला यांनी आपले कर्तव्य पार पाडून सामाजिक भान राखत गरीब मजुरांना मदत कार्य केले. यावेळी जाताना या मजुरांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी रायगड पोलिसांचे आभार मानले.
