School Students
आजपासून बारावीची परीक्षा सुरु
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा आज, २१ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. बारावीच्या परीक्षेला राज्यभरातील १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसणार असून २ हजार ९५७ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा २० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
परीक्षेतील कॉपी सारखे गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने २५२ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांसाठी मोबाईल बंदी घातली असून, शिक्षकांनी मोबाईल, केंद्र संचालकांकडे जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यंदाच्या परीक्षेची महत्त्वाची बाब म्हणून मुंबईतील सोफिया कनिष्ठ महाविद्यालयातील निष्का नरेश हसनगडी ही दिव्यांग विद्यार्थिनी आय-पॅडवर परीक्षा देणार आहे. निष्काला लिहिता येत नाही, त्यामुळे तिला नियमानुसार तशी परवानगी देण्यात आली आहे, असे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले.
