रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये १०० टक्के अधिकारी तर ३३ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अलिबाग : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम १८९७ च्या कलम २ अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. ०३ मे २०२० या तारखेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.
मात्र आता लॉकडाऊन कालावधी दि. ०३ मे २०२० रोजीच्या रात्री १२.०० पासून ते दि.१७ मे २०२० रोजीच्या रात्री १२.०० वा. पर्यंत लागू करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पनवेल व उरण वगळून इतर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालये १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरु करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये १०० टक्के अधिकारी व ३३ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील शासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी रायगड, विशेष विवाह अधिकारी यांची जिल्ह्यातील सर्व कार्यालये १०० टक्के अधिकाऱ्यांच्या व ३३ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरु करण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
तसेच सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त असणारी सर्व कार्यालये अधिकारी १०० टक्के व कर्मचारी ३३ टक्के या उपस्थितीप्रमाणे सुरु करुन दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत दिलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांप्रामणे शासकीय कामकाज करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.
