“ही वेळ कोणतंही राजकारण करण्याची नाही” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राज्यातील भाजप नेत्यांना कानपिचक्या
नागपूर/मुंबई: केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात सद्य स्थितीत चालणाऱ्या राजकारणावर विशेष भाष्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले की, “आपला देश करोनाच्या संकटाशी लढतो आहे. अशात कुणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये. ही वेळ कोणतंही राजकारण करण्याची नाही. सध्या एकजुटीने करोनाचा सामना करणं ही देशाची गरज आहे.” हा टोला स्वपक्षातील भाजप नेत्यांना उद्देशून होता हे सांगण्याची आवश्यकता नाही.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीला लक्ष करत आहेत. याशिवाय फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऐवजी ‘पीएम केअर्स’ फंडात मदत निधी जमा करण्याचे आवाहन करत आहेत. यामुळे भाजप नेतेही ट्रॉलर्स च्या निशाण्यावर आलेले आहेत. नितीन गडकरी यांनी केलेल्या व्यक्तव्याला भाजप नेते गंभीर्याने घेतात का हे पाहणे लक्षणीय ठरेल.
