५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर
मुंबई, दि. १३: राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यानुसार १२ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
या निवडणुकांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित जिल्ह्यांतील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या सर्व जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. हे अर्ज २१ जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होईल, तर २७ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी असेल. याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होऊन निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
प्रचाराची मुदत ३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत असेल. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी एक आणि पंचायत समितीच्या गणासाठी एक अशी दोन मते देता येणार आहेत. या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (EVM) वापर केला जाणार आहे. १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीतील मतदारांना मतदानाचा हक्क राहील. मतदारांना ‘मताधिकार’ या मोबाइल ॲपच्या माध्यमातून आपले नाव मतदार यादीत तपासता येईल.
राज्यातील या निवडणुकांसाठी सुमारे २ कोटी ९ लाख मतदार असून त्यांच्यासाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे १ लाख २८ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
