Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मातृभाषा आणि मातृभूमीबद्दल अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मातृभाषा आणि मातृभूमीबद्दल अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

यवतमाळ: माता, मातृभाषा आणि मातृभूमी या तिन्हीबद्दल प्रत्येक नागरिकाने अभिमान बाळगला पाहिजे. त्यासाठी आवश्यक जाणिवा संवर्धित करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल यवतमाळ येथे केले.

यवतमाळ येथील हिंदी प्रसारक मंडळ बेरारतर्फे २४ व्या जवाहरलाल दर्डा स्मृती समारंभानिमित्त जवाहरलाल दर्डा इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारतीचे लोकार्पण व अस्थिरोग आरोग्य शिबिराचा प्रारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, रोजगार हमी योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. गोवर्धन लाल पाराशर, संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा, संस्थेचे सदस्य व माजी मंत्री राजेंद्र दर्डा, सचिव किर्ती गांधी, शाळेच्या प्राचार्य मिनी थॉमस आदी यावेळी उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून देण्याचा आग्रह धरण्यात आल्याचे स्पष्ट करून राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले की, आपल्या मातृभाषेविषयी आस्था आणि अभिमान जोपासताना तिच्याबाबतच्या जाणिवा वृद्धिंगत होण्यासाठी कृतीशील प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या मूळ सांस्कृतिक परंपरांविषयी आपण आग्रही असले पाहिजे. या परंपरांशी असलेली बांधिलकी प्रत्येकाने कायम ठेवावी. आपल्या संस्कृतीत अनेक उदात्त परंपरा आहेत. या परंपरांचे पालन करताना पूर्वजांचे कृतज्ञ स्मरण ठेवले तरच समाज व देशाचे सांस्कृतिक उत्थान होऊ शकेल, असे त्यांनी यावेळी आग्रहाने सांगितले.

भारत ही जागतिक महासत्ता होण्यासाठी सर्वांनी संकल्प करायला हवा, असे आवाहन करून कोश्यारी म्हणाले की, भारत हा जगद्गुरु झाला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. नव्या भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी कटिबद्ध होऊन प्रयत्न करताना, देशात विषमता समाप्त होऊन समता स्थापित करण्यासाठीही आपण झटले पाहिजे. हीच स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनकार्याचा गौरव करताना त्यांच्या पक्षापलिकडील व्यक्तिमत्वामुळे त्यांना समाजाच्या सर्व स्तरांतून आदर प्राप्त झाल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले. आपल्या भाषणात राज्यपालांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचेही स्मृतीदिनानिमित्ताने कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.

जवाहरलाल दर्डा हे समतेच्या विचारांवर दृढ श्रद्धा असणारे व्यक्तिमत्व होते. समाजात सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी आपल्या कार्याद्वारे योगदान दिले. दर्डा परिवाराने त्यांचा वारसा निष्ठेने जोपासला आहे, असे माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सामान्य रूग्णालय व नाट्यगृहाचे काम गतीने पूर्ण होईल : पालकमंत्री भुमरे

यवतमाळ शहरातील नाट्यगृह व सामान्य रूग्णालयाचे काम पूर्ण होण्याची मागणी माजी खासदार दर्डा यांनी आपल्या मनोगतात केली. त्याबाबत पालकमंत्री भुमरे म्हणाले की, सामान्य रूग्णालयासाठी सव्वाशे कोटी रूपये मंजूर झाले असून, जागेअभावी काम रेंगाळले होते. तथापि, कालच जागा निश्चित करण्यात आली आहे. याबाबत वनविभागाची परवानगी घेण्यासह इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जाईल.

नाट्यगृहाचे काम पुढे जाण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रूपये देण्याची घोषणा पालकमंत्री भुमरे यांनी यावेळी केली. हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. याच निधीतून कोरोनाकाळातही ५० रूग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. जवाहरलाल दर्डा यांची रचनात्मक कार्यावर श्रद्धा होती. त्यांचे व्यक्तित्व व कार्य आम्हा सर्वांसाठी चिरंतन प्रेरणादायी असल्याचे सांगून मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विजय दर्डा यांनी केले. डॉ. पाराशर यांनी यावेळी ओस्टिओपॅथी उपचारपद्धतीबाबत माहिती दिली. ही उपचार पद्धती पुनरूज्जिवित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सचिव गांधी यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य शिबिरात सहभागी डॉक्टरांच्या पथकाचाही यावेळी गौरव करण्यात आला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *