महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सरासरी ६१% मतदान
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमधील पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडलं. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील ९१ जागांसाठी काल मतदान झालं. पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे.
राज्यातल्या सात मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६१ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
नागपूर – ५४ टक्के, वर्धा – ५५ टक्के, रामटेक – ५१.७३ टक्के, भंडारा-गोंदिया ६७ टक्के, गडचिरोली – ६१ टक्के, चंद्रपूर ६० टक्के आणि यवतमाळ-वाशिम ६० टक्के मतदान झाले आहे.
११६ उमेदवारांचं भवितव्य काल मतपेटीमध्ये बंद झालं आहे तर नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहिर, नाना पटोले यासारख्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
