विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणाला भाजपच्या अंतर्गत राजकारणाची किनार? अंजली दमानिया यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
मुंबई, दि. १९: राज्याच्या राजधानीला खेटून असलेल्या विरारमध्ये आज एक हाय व्होल्टेज नाट्य घडलं. विरार येथे असलेल्या विवांता या पंचतारांकित हॉटेलवर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अचानक धडक देत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटप करत असल्याचे गंभीर आरोप केले. हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांनी यावेळी विनोद तावडे यांना धारेवर धरले तसेच तावडे यांच्या एकूण ३ डायऱ्यांमधल्या नोंदी प्रसारमाध्यमांसमोर उघड करत ५ कोटी रुपयांचे वाटप करण्यासाठी विनोद तावडे विरार मध्ये आल्याचा आरोप केला. विनोद तावडे यांना अटक करावी व त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा हि मागणीही त्यांनी केली. यावेळी बीविआ च्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना जागेवरून हलूही दिले नाही. याठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ उडवून दिल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागले.
या साऱ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी विशेषतः महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. जर खरंच या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता तर हि बातमी बाहेर नेमकी गेली कशी असा सवालही उपस्थित होत आहे. विनोद तावडे हे राज्यातील राजकारणात सक्रिय असलेल्या मराठा समाजातील नेत्यांपैकी एक प्रमुख नेते मानले जातात. मागील काही वर्षांपासून भाजपच्या केंद्रीय राजकारणात विशेष स्थान प्राप्त केलेल्या विनोद तावडे यांना पुन्हा महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय होण्याचे वेध लागले होते. त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात असतानाच नेमक्या याच वेळी हे प्रकरण बाहेर आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या साऱ्याला मराठा – ब्राम्हण वादाची किनार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थोड्याच वेळापूर्वी एक्स या मायक्रोब्लॉग्गिंग प्लॅटफॉर्मवर देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. त्या म्हणतात कि, जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब आहे. अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? जे खुर्ची साठी एकमेकांचा गळा कापायला निघाले ते महाराष्ट्राच्या लोकांचे काय भलं करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पैसे वाटणे, मतं विकत घेणे आणि आता हे? आणि काय काय पहावे लागणार आहे. किळस येतेय या घाणीची असे म्हणत त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे.
