शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा ‘वचननामा’ प्रसिध्द
मुंबई, दि. ०७: महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज मुंबई येथे आपला वचननामा प्रसिद्ध केला. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे इथल्या मातोश्री निवासस्थानी या वचननाम्याचं प्रकाशन झालं.
या वचननाम्यात शिक्षण, महिला सुरक्षा ते अगदी बारसू रिफायनरी रद्द करण्यापर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. हा आपल्या पक्षाचा वचननामा असून महाविकास आघाडीचा सविस्तर जाहीरनामा येत्या काही दिवसात जाहीर होईल, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसनेच्या वाचननाम्यातील ठळक मुद्दे वाचा:
- प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार
- शिक्षण: जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार
- अन्नसुरक्षा: शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार
- आरोग्य: प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार
- पेन्शन: सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
- वंचित समूह: वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार
- मुंबई: धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार
- महिला: महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार. प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र २४x७ महिला पोलीस ठाणे सुरु करणार. अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार
- उद्योग: बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार. निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार
