सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे राजकीय निरीक्षकांच लक्ष
मुंबई, दि. ०३: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. २८८ मतदारसंघांमध्ये एकंदर ७ हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत तर कोकणात उमेदवारांची संख्या अतिशय मर्यादित आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात ९८, तर बीडमध्ये ९० उमेदवारांचे अर्ज वैध आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त ५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहीम आणि सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत प्रत्येकी ६, तर शिवडी आणि कुडाळमध्ये ७ उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत.
दरम्यान माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या समोर उभे ठाकलेले शिवसेना(शिंदे गट) चे उमेदवार सदा सरवणकर यांच्या भूमिकेकडे सबंध राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. मागील काही दिवसांपासून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी भाजपसह स्वपक्षातील नेत्यांकडून दबाव टाकला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी तर थेट भाजप अमित ठाकरे यांचा प्रचार करेल असे वक्तव्य माध्यमांसमोर केले होते, ज्याला सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांनी सडेतोड उत्तर दिले. या साऱ्या पार्श्वभूमीवर सदा सरवणकर दबावाला बळी पडतात कि आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.
