काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्याने उमेदवार बिनविरोध
मुंबई, दि. २: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. आता ठिकठिकाणच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते, तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्याने उमेदवार बिनविरोध आहेत. उद्या निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल.
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या गोवंडी विभागात समाजवादी पार्टीचे उमेदवार इरफान खान यांनी आपला अर्ज मागे घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
उमेदवारी मागे घेण्याच्या घडामोडींमुळे ठाणे शहरात शिवसेनेच्या पाच उमेदवारांना प्रतिस्पर्धी उरलेले नाहीत. ठाण्यात शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत केले असून त्या पक्षाच्या उमेदवार दिपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत भाजपाचे १५ उमेदवार तर शिवसेनेचे पाच उमेदवार बिनविरोध ठरले आहेत. भिवंडी–निजामपूर मतदारक्षेत्रात भाजपाचे सहा उमेदवार बिनविरोध ठरले आहेत.
पनवेल महानगरपालिकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना सात उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले. परिणामी भाजपचे आठ उमेदवार थेट विजयी ठरले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १८(ब) मधून नितीन पाटील यांची सर्वप्रथम बिनविरोध निवड झाली. शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज छाननीदरम्यान बाद झाल्याने पाटील यांचा मार्ग सुकर झाला.
मतदानाआधीच भाजपचा पहिला नगरसेवक निश्चित झाल्यानंतर, अर्ज माघारी घेतलेल्या सात उमेदवारांमुळे एकूण आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे महायुतीचे आठ नगरसेवक पनवेल महापालिकेत विजयी ठरले असून केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपला स्पष्ट फायदा झाला आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भारतीय जनता पक्षाच्या ६ तर शिवसेनेच्या ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत . त्यामुळे आता ६३ जागांसाठी निवडणूक होईल.
धुळे महापालिका निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपाचे चार नगरसेवक बिनविरोध ठरले आहेत. उमेदवारी मागे घेण्यावरून धुळ्यात मोठा वाद झाल्याचं दिसून आलं. देवपूर परिसरात दोन गटांमध्ये हाणामारीचा प्रकारही घडला. नाशिक महानगरपालिकेत बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले जावेत, यासाठी नेत्यांनी मोठे प्रयत्न केले.
सिडको विभागात हर्षा बडगुजर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६८२ अर्ज पडताळणीअंती वैध ठरले होते. शेवटच्या दिवशी ३०१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. परंतु, आज जे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहे हे फार निराशाजनक असल्याचा लोकशाहीच्या अभ्यासकांचा सूर आहे. कारण ज्या ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली आहे तेथे जर सामान्य मतदाराला त्याच्या आवडीच्या पक्षातील उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा असेल तर त्याला आता कोणताच पर्याय उपलब्ध राहणार नाही. मतदान करण्याचा त्याचा मुलभूत हक्क नाकारला जातोय. अशा वेळी जर निवडणूक होऊन तेथे ‘नोटा’ NOTA चा पर्याय ठेवला तर किमान पैशांच्या व बाहू शक्तीच्या जीवावर बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांना जमिनीवर आणण्याचा मार्ग उपलब्ध राहील.
