महसूल गुप्तचर संचालनालयने (नागपूर युनिट) उज्जैनमध्ये २ बिबट्याचे कातडे आणि हस्तिदंत केले जप्त
नागपूर, दि. ६: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर युनिटने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे कारवाई करत दोन बिबट्यांची कातडी आणि एक हस्तिदंत जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या नागपूर युनिटने उज्जैनमधील एका हॉटेलमध्ये दोन व्यक्तींना ताब्यात घेतले.
जप्त केलेल्या वस्तू आणि त्या व्यक्तींना वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ अंतर्गत पुढील तपासासाठी उज्जैनच्या जिल्हा वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. जप्त वस्तूंमध्ये दोन बिबट्यांची कातडी आणि एक हस्तिदंत यांचा समावेश आहे. बिबट्यांना वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची १ मध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या कातडी किंवा अवयवांचा व्यापार, विक्री, खरेदी किंवा ताबा ठेवणे कायद्याने प्रतिबंधित आहे.
यापूर्वी देखील जानेवारी २०२५ मध्ये डीआरआय नागपूर युनिटने अकोला येथे बिबट्याची कातडी जप्त केली आणि तीन व्यक्तींना अटक केली होती. गुप्त माहितीच्या आधारे अवैध वन्यजीव व्यापार रोखण्यासाठी डीआरआय सातत्याने प्रयत्न करते. वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ ची अंमलबजावणी करण्यासाठी डीआरआय राज्य वन विभाग आणि इतर संस्थांशी सहकार्य करते. या प्रयत्नांचा उद्देश भारतात आणि सीमेपलीकडे वन्यजीव अवयवांच्या अवैध व्यापाराचे जाळे नष्ट करणे आहे.
भारत सरकार धोक्यात असलेल्या प्रजातींचे संरक्षण आणि जैवविविधतेचे जतन करण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करते. डीआरआय संवर्धन कायद्यांना पाठिंबा देण्यासाठी सक्रियपणे कार्य करते. वित्त मंत्रालयाने वन्यजीव संरक्षणाच्या कायदेशीर तरतुदींचे पालन करण्याचा संकल्प पुन्हा व्यक्त केला आहे.
