मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकच बसवणार; आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची गर्जना
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आमदारांसोबतची नियोजित बैठक मालाड येथील हॉटेल रिट्रीट येथे संपन्न झाली असून या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकच बसवायचा असल्याचे नमूद केल्याचे कळते. यावेळी त्यांनी सर्व आमदारांचा सत्ता स्थापनेबाबतचा कलही जाणून घेतला.
त्याचवेळी जयपूर मुक्कामी असलेल्या काँग्रेस आमदारांनी शिवसेनेसोबत युती करावी अशी मागणी वरिष्ठांकडे केल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आपल्या आमदारांची पुनः एकदा बैठक बोलावली असून या बैठकीत शिवसेनेसोबत जात महाशिव आघाडी स्थापन करायची का? या बाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. काल रात्री युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी हॉटेल रिट्रीट येथेच मुक्काम ठोकला होता. उद्या संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सरकार स्थापनेसाठी लागणारे बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपाल भगत सिंग कश्यारी यांनी भाजपला दिली आहे. भाजप बहुमत सिद्ध करू शकेल का हे पाहणे लक्षणीय ठरेल.
