पाचही पात्रांना दिल्लीतील रंगमंचावर भूमिका मिळणे अशक्यच : उद्धव ठाकरे
काँग्रेसविरोधात शरद पवारांनी दोन वेळा भूमिका घेतल्या. एकदा इंदिरा गांधी हयात असताना व नंतर सोनिया गांधींच्या विरोधात विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी ‘बंड’ पुकारले, पण शेवटी बंडोबा थंडोबा झाला, अशा शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सामना मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसविरोधात पवारांनी दोन वेळा भूमिका घेतल्या. एकदा इंदिरा गांधी हयात असताना व नंतर सोनिया गांधींच्या विरोधात विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी ‘बंड’ पुकारले, पण शेवटी बंडोबा थंडोबा झाला. आताही आवळ्या-भोपळ्याची मोट बांधून काही नवे घडवता येईल काय? या भूमिकेत ते आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाच्या शोधातील तीन पात्रांची नावे जाहीर केली. आता चौथे नाव नजरचुकीने राहून गेले ते राहुल गांधी. स्वतः पवार पाचवे आहेत. अर्थात या पाचही पात्रांना दिल्लीतील रंगमंचावर भूमिका मिळण्याची शक्यता अजिबात नाही. दिल्लीची आजचीच घडी कायम राहील. घडी विस्कटावी असे वातावरण देशात नाही!
उत्तर प्रदेशात मायावतींच्या जाहीर सभेत एक उधळलेला सांड घुसला. सांडाने सभेसाठी जमलेल्या गर्दीची पांगापांग केली. त्या सभेसाठी अखिलेश यादव हेदेखील हेलिकॉप्टरने पोहोचणार होते. अखिलेश यांनी हेलिकॉप्टरमधून मैदानावरील सांडाने उधळलेली सभा पाहिली व तो सांड शांत होईपर्यंत यादवांनी हेलिकॉप्टर उतरवण्याची हिंमत दाखवली नाही. सभेत सांड सोडण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाचे असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. विरोधकांच्या सभा उधळण्यासाठी भाजपास अशा सांडांची खरोखरच गरज आहे काय? असा सवाल त्यांनी मुखपत्राच्या माध्यमातून केला.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. या पवारांच्या विधानाने खळबळ कमी आणि खळखळ जास्त झाली. खळबळीचा प्रश्नच नाही, पण काँग्रेसच्या गोटात मात्र अपेक्षेप्रमाणे खळखळ झाली. पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना शरद पवारांचा पाठिंबा नाही असे नाराजीचे सूर उमटले. बाजारात तुरी असतानाच काँग्रेस महाआघाडीत पंतप्रधानपदावरून ‘मारामारी’ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले. राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे काँग्रेसचे प्रवक्ते बोलू लागले. आता पवारांनी नेहमीप्रमाणे शब्द फिरवला असून आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा केला आहे. राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी महाआघाडीकडे आणखी कोणते नेते आहेत, या प्रश्नावर आपण तीन पात्रांची नावे घेतल्याचे पवार कितीही सांगत असले तरी या नाट्यातील ‘चौथे’ किंवा ‘पाचवे’ पात्र स्वतः शरद पवार आहेत, असा टोला देखील उद्धव यांनी लगावला.
शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसचे चार आण्याचे सदस्यत्व स्वीकारले व त्यांनी मोहम्मद अली जीनांचे गुणगान सुरू केले. लोकांचा संताप दिसताच सिन्हा म्हणाले, ‘‘नाही हो, मला मौलाना आझादांचे नाव घ्यायचे होते. चुकून जिभेवरून जीनांचे नाव सटकले!’’ काँग्रेसच्या ‘पोटांतले’ जीना शेवटी असे ओठावर येत असतात. सिन्हा यांची त्यात काही चूक आहे असे आम्हाला वाटत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
