तुमचे घोटाळे आठवा, मग विचारा लाज वाटते का? – उद्धव ठाकरे यांची आघाडीवर जोरदार टीका
मुंबई: शिवसेना-भाजप महायुतीचे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारसभेचे आयोजन मंगळवारी गोरेगाव येथे करण्यात आले होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
देशाची सत्ता ५० ते ६० वर्षे काँगेसच्या हातात होती. या काळात इतके घोटाळे केलेत की, यांची मुले आता घोटाळ्यांच्या नावावरून शाळेची बाराखडी शिकतात. सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, टू जी घोटाळा, कोळसा घोटाळा…! तेव्हा आधी मनमोहन सिंगांच्या दहा वर्षांच्या काळातले घोटाळे आठवा आणि मग विचारा लाज वाटते का, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आघाडीवर केली आहे.
कीर्तिकर यांच्या समोर उभे असलेल्या निरुपम यांच्याबद्दल बोलावे इतकी त्यांची पात्रता नाही. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष हकालपट्टी केलेले ते नेते आहेत, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी म्हणजे पडलेला फुगा असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.
पुढे ते म्हणाले, राज्यात युती का झाली? यातून काँग्रेस-राष्ट्रवादी अद्यापही सावरली नाही. युती ही हिंदुत्वाच्या विचाराची; देशाची अखंडता, अयोध्येत राममंदिर उभारणीच्या मुद्द्यावर झाली आहे. काही मुद्द्यांवर भाजपसोबत वाद होता. पण, ते निकाली निघाले आहेत. त्यामुळे आता शिवसेना-भाजप महायुती ही निवडणुकीत एकदिलाने काम करीत आहे. महायुतीचाच विजय होणार, असा विश्वास त्यांनी दर्शविला.
आज हयात नाहीत त्या दिवंगत माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव वारंवार कशाला घेताय? पर्रीकरांच्या चिरंजीवांनी तर तुम्हाला उत्तर दिलेच, पण असे हीन राजकारण करताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.
मांजर डोळे मिटून दूध पिते…तसा यांनी देश पिळून खाल्लाय. पवारसाहेब, राहुल गांधी, तुमच्या आघाडीचा धृतराष्ट्र झालाय पण माझ्या महाराष्ट्राचे डोळे उघडे आहेत. त्या उघडय़ा डोळ्याने ही जनता दिल्लीच्या तख्तावर पुन्हा एकदा भगवा फडकवणार आहे. मतदार मर्द असतो. जिथला मतदार मर्द असतो तिथला खासदारही मर्द असतो. धनुष्यबाण आणि कमळ या दोनच निशाण्या देशाला सुरक्षित ठेवतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
