“देशद्रोह्यांना फासावर लटकवणारे सरकार हवे की, देशद्रोह्यांना मांडीवर घेऊन खाऊ-पिऊ घालणारे सरकार हवे?” – उद्धव ठाकरे
रामटेक: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज विदर्भ दौऱ्यावर असून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारासाठी त्यांनी काल (रविवार) जाहीर सभा घेतली. कळमेश्वर येथील कृषी बाजार समितीच्या मैदानात झालेल्या या प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी देशाच्या सुरक्षेसोबत खेळणाऱ्या विरोधकांवर टीका केली.
विरोधीपक्षांवर मुख्यत्वे काँग्रेस वर टीका करताना ते म्हणाले की, “देशद्रोह्यांना फासावर लटकवणारे सरकार हवे की, देशद्रोह्यांना मांडीवर घेऊन खाऊ-पिऊ घालणारे सरकार हवे?” ज्या पक्षाचा प्रदेशाध्यक्षच म्हणतोय मला राजीनामा द्यावासा वाटतो आणि तो पक्ष सरकार स्थापनेचे स्वप्न बघतोय असे म्हणत अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांनी काँग्रेस ला टोला लगावला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
शिवसेना-भाजपा-मित्रपक्षाचे उमेदवार आपल्याला खासदार म्हणून दिल्लीत पाठवायचे आहेत – उद्धव ठाकरे
पाकिस्तानने जर का कुरापत काढली तर पाकिस्तानमध्ये घुसून ठोकू असं सांगणारे पंतप्रधान नुसते बोलून गप्प बसत नाही, तर दोन वेळा घरात जाऊन धडा शिकवून आलो आहोत आपण – उद्धव ठाकरे
माझ्या शेतकऱ्याला योग्य हमीभाव मिळावा ही त्याची अपेक्षा आहे आणि ती देण्यासाठी शिवसेना आणि भाजपा वचनबद्ध आहेत – उद्धव ठाकरे
जी काही ताकद आहे, जी काही शक्ती आहे, ती पूर्ण शक्ती मी पणाला लावेन पण शेतकऱ्यांची साथ कधी सोडणार नाही – उद्धव ठाकरे
जिंकायचं तर आहेच, देशासाठी जिंकायचं आहे, भगव्यासाठी जिंकायचं आहे, शेतकऱ्यांसाठी जिंकायचं आहे – उद्धव ठाकरे
रामटेक हा आपला भगव्याचा बालेकिल्ला आहे – उद्धव ठाकरे
माझं स्वप्न हे देशासाठी आहे, तुमचं स्वप्न फक्त खुर्ची आहे – उद्धव ठाकरे
