“नुसतं पोटला तड लागून होणार नाही, तर डोक्याला तिडक गेली पाहजे” – उद्धव ठाकरे
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर झालेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान देत बोचरी शैलीत भाष्य केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी एक आवाहन दिलं की, उद्धव ठाकरेंचं विकासाचं एक भाषण दाखवा त्यांना मी हजार रुपये देतो. मात्र मला त्यांचा चोरीचा पैसा नकोच. पण देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला आवाहन देतो की, मोदींपासून ते तुमचं आणि तुमच्या खालच्या चेल्या-चंपाट्यांचं अगदी वर्गातल्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू-मुस्लिम नं करता केलेलं भाषण दाखवा आम्ही सर्व मिळून तुम्हाला एक लाख रुपये देतो.”
यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करत, “अहो मेवाभाऊ तुम्ही आम्हाला काय शिकवताय, हे सगळं अडानीकरण चाललंय. आमच्या मुंबादेवीवरुन मुंबईचं नाव ठेवलं आता त्या मुंबईचं नाव बॉम्बे करण्याचा डाव चालला आहे,” असं स्पष्टपणे सांगितलं.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका ठाम शब्दांत मांडली. “राज ठाकरे जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो आणि भागिनींनो म्हणाला आणि उद्धव ठाकरे जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भागिनींनो म्हणालो, यावरूनच उद्याच्या चर्चा होतील. आम्ही अस्सल मराठी बोलणारो देशभक्त हिंदू आहोत. राज यांनी आज उत्तम मांडणी केली. एवढं पोट तिडकीने सांगितलं, मात्र नुसतं पोटला तड लागून होणार नाही, तर डोक्याला तिडक गेली पाहजे. आणि जर ती जाणार नसेल तर आपल्याला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही,” असे ते म्हणाले.
ठाकरे बंधू एकत्र आल्यावर निर्माण झालेल्या चर्चांवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. “जयंतराव पाटील आज भावकी एक झालीय, गावकीपण एकत्र होतेय. अनेक जण प्रश्न विचारात होते हि ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का? आमचं अस्तित्व संपवणारं नेतृत्व अजून जन्माला आलं नाही, आमचं अस्तित्व तुमच्या समोर आहे. मराठीसाठी एकत्र आलोय, आमच्यातील वाद आम्ही गाडून एकत्र आलोय आणि मुंबईसाठी, मराठी माणसासाठी आणि हिंदूंसाठी एकत्र आलोय,” अशी गर्जना त्यांनी केली.
महत्त्वाचं म्हणजे, तब्बल २० वर्षांनंतर शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची संयुक्त शिवगर्जना पाहायला मिळाली. मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक मानलं जात आहे. या सभेसाठी मनसैनिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवतीर्थावर जमा झाले होते.
शिवतीर्थ, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क, हे केवळ एक मैदान नसून ठाकरे कुटुंबासाठी भावनिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. याच ठिकाणी झालेल्या या संयुक्त सभेत ठाकरे बंधूंनी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीवर चौफेर टीका केली.
आगामी महापालिकेचा सुमारे ७५ हजार कोटींचा अर्थसंकल्प, मुंबईचं देशात आणि आशियात असलेलं आर्थिक महत्त्व आणि मराठी मतदारांची भूमिका या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी मराठी जनतेला भावनिक साद घातली आहे. या आवाहनाला मतदार कसा प्रतिसाद देतात, हे आता आगामी निवडणुकांत स्पष्ट होणार आहे.
