उद्योग मंत्री उदय सामंत यांचे छ. संभाजी नगर येथील विमानतळ प्रांगणातील बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळ्यादरम्यान प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर, दि.२८ : जनसामा
येथील विमानतळाच्या प्रांगणात ‘भिमता’ (Buddhist Indusatrial Maufacturers And Traders Association) या संस्थेच्या वतीने साकारण्यात आलेल्या बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळ्यासाठी मंत्री सामंत आले होते. पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, भिमता चे अध्यक्ष मिलिंद थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

प्रशिक्षण केंद्राला जागा देणार
मंत्री सामंत म्हणाले की, जगाला अहिंसेचा संदेश भगवान बुद्धांनी दिला. जनतेचे दुःख दूर करण्यासाठी त्यांनी खडतर तप केले. अशा या बुद्धा पुढे नतमस्तक होऊन सगळ्यांनी शासनाने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जे जनकल्याणाचे कार्य आरंभले आहे त्यात आपला सहयोग द्यावा. लोकांना त्रास देऊन, बदनामी करुन काहीही साध्य होत नाही. जातीवर नव्हे कर्तृत्वावर श्रेष्ठत्व ठरत असतं. शासन अशा सर्व समाज घटकांसोबत आहे. उपेक्षितांच्या कल्याणासाठी प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले. ‘भिमता’, संस्थेला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा देण्यासंदर्भात लवकरच मान्यता प्रदान करु, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच ‘भिमता’ या संस्थेने बुद्ध मूर्ती स्थापनेसाठी केलेले प्रयत्न व संस्थेचे उद्योग क्षेत्रातील कार्य याबद्दल त्यांनी प्रशंसोद्गारही काढले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा-वेरूळ लेण्यांमधून बौद्ध संस्कृतीचे दर्शन होते. जगभरातून येथे येणाऱ्या पर्यटकांना शहराच्या ऐतिहासिक वारशाची जाणीव व्हावी, यासाठी विमानतळावर भव्य बुद्धमुर्ती उभारण्याची कल्पना पुढे आली. ‘भिमता’ संघटनेच्या सदस्यांनी हा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाकडे सादर केला. ११ जानेवारी २०२३ रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. तेलंगणातील आलागट्टा येथे १५.५ फूट उंच आणि अखंड बेंगलोरी ग्रॅनाइटमध्ये अभयमुद्रा असलेली बुद्धमूर्ती तयार करण्यात आली. ही बुद्धमूर्ती ५ मे २०२३ रोजी बौद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी स्थानापन्न करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण परिसराचे सुशोभिकरण करून आज लोकार्पण करण्यात आले.
