Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

विविध चरित्र साधने समित्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

विविध चरित्र साधने समित्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई, दि.२८: महापुरुषांचे जागतिक दर्जाचे लेखन, त्यांची भाषणे, त्यांनी मांडलेले विचार संकलित आणि संपादित, संशोधन करुन साहित्य प्रकाशित करुन जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी विविध चरित्र साधने समिती गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समिती बैठक झाली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैचारिक जडणघडणीत महान व्यक्ती व समाजसुधारकांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. या महापुरुषांचा जीवनपट, त्यांचा संघर्ष त्यांनी समाजासाठी राष्ट्रासाठी केलेला त्याग त्यांच्या साहित्यातून डोळ्यासमोर उभा राहातो. यातून प्रेरणा घेऊन सध्याची पिढी राष्ट्राचा आणि राज्याचा विकास यात आपले योगदान देत असते. महापुरुषांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी चरित्र साधने समित्या गठित करण्यात आल्या आहेत. विविध चरित्र समित्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाकडे लेखी प्रस्ताव समितीकडून पाठवावा. या मागण्यांसंदर्भात लवकरच एकत्रित बैठक घेऊन सदस्य सचिवांचे मानधन, प्रवासभत्ता, राहण्याची व्यवस्था, यासाठी लागणारे मनुष्यबळ, कार्यालय व्यवस्था याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उत्तम दर्जाचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी सर्व मान्यवरांनी कालमर्यादेत संशोधनाला गती द्यावी, विविध मान्यवरांच्या गुणवत्तेचा आदर करुन समित्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रदीप आगलावे, महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिव प्रा. हरी नरके, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव बाबा भांड, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिव डॉ. संजय शिंदे, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव डॉ. श्रद्धा कुंभोजकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सिद्धार्थ खरात, विविध समित्यांचे सदस्य आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *