“मराठी माणसाच्या ‘शक्ती’समोर सरकारची ‘सक्ती’ हरली” – उद्धव ठाकरे
मुंबई, दि. २९: त्रिभाषा सूत्राविरोधाच्या आंदोलनाचा भाग म्हणून आज दुपारी मराठी अभ्यास केंद्र व शिवसेनेतर्फे तृतीय भाषेसंबंधी सक्तीबाबतच्या शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. या कार्यक्रमानंतर काही तासातच राज्य सरकारने तृतीय भाषेसंबंधीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एकां समितीचे गठन केल्याची घोषणा केली. या साऱ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले कि, “मराठी माणसाची शक्ती सरकारच्या सक्तीला हरवू शकते, हे त्रिभाषा धोरणासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयावरून स्पष्ट होतं” , यासंदर्भात सरकारनं नेमलेल्या समितीला काहीही अर्थ नाही. कोणतीही समिती नेमली, तरी हिंदीची सक्ती करू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठी माणसानं एकत्र येण्यासाठी एखादं संकट यायची वाट पाहू नये. ही जाग कायम ठेवावी, असं आवाहन त्यांनी केलं. हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला होणारा मोर्चा रद्द केलेला नाही, उलट जल्लोष किंवा विजयी मोर्चा किंवा सभा या दिवशी होईल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
