शिवसेनेच्या ५९व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांचे भाजप, एकनाथ शिंदेंसह विरोधकांवर घणाघाती आसूड
मुंबई, दि. १९: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करून आज ५९ वर्ष झाली. आज दुर्दैवाने शिवसेनेची दोन शकलं झाली असून खुद्द ठाकरेंनाच मूळ पक्षातून निर्वासित व्हावं लागलंय. ते शल्य पचवत उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दैदीप्यमान कामगिरी बजावली. परंतु, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनाला शिंदेच्या शिवसेनेने धोबी पछाड केलं. आज झालेल्या वर्धापनदीनाच्या भाषणात उद्धव ठाकरे पराभवाचं शल्य विसरून आपल्या सैनिकांना कोणता मंत्र देतात याकडे सबंध राज्याचं लक्ष लागून होतं. अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी तब्बल अर्धा तास केलेल्या भाषणातून ठाकरी शैलीत भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे ते थेट नितेश राणेंपर्यंत सर्वांचा समाचार घेतला.
जाणून घ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
- शिवसेना अजूनही तरुण आहे अजून ही तरुणच राहणार आहे. तिकडे चोरांचा बाजार भरला होता. पहिल्या मेळाव्याच्या वेळी बाळासाहेब यांनी शिवाजी पार्कत मेळावा घेतला होता. त्यावेळी मी माझ्या माँच्या मांडीवर बसलो होतो. राजकारणात ज्यांना पोरं होतं नाहीत ते आमच्यावर टीका करतात. तुला पोर होत नाहीत त्याला आम्ही काय करू? किती पाहिजे आहेत तेवढी पोर घे.
- भाजपला स्वतःची पोरं नाहीत त्यामुळे त्यांना अशी घ्यावी लागतात. ते आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत. ज्या वल्लभ भाई पटेल यांनी भाजपवर बंदी आणली त्यांचाच पुतळा सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा बांधण्याची वेळ आली
- उंची पेग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कुणासारखे ते माहिती नाही. अरे तुझा जीव किती, तू बोलतो किती? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? एक कुणीतरी बाप ठरवं आणि मग बोल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली.
- कार्यकर्त्यांच्या आणि राज्याच्या मनात जे आहे तेच मी करणार. पण हे होऊ नये म्हणून यांच्या मालकाचे लोक इकडे तिकडे, हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत. मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर यांच्या मालकाचे काय होणार? मुंबईत मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून हे प्रयत्न करत आहेत. मुंबई आमचीच. ठाकरे ब्रँड संपवायला गेला तर तुमचे नामोनिशाण ठेवणार नाही.
- हिंदी सक्तीचा करण्याची गरज काय? हिंदीला आमचा विरोध नाही, पण हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. हिंदी सक्ती करायची तर ती गुजरातमध्ये करा. निवडणुकीच्या तोंडावर मराठी आणि अमराठीमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम भाजपने केला. म्हणजे हे भ्रष्टाचार करायला मोकळे.
- आतापर्यंत त्यांनी जे वादे केले होते ते फसवे केले होते. निवडणुकीत त्यांनी जनतेशी वादा यांनी पाळला नाही. मग मला केलेला वादा, अडीच वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा तो तरी यांनी कसा पाळला असता. हे पणवती सरकार आहे. आम्ही इंडिया आघाडी स्थापन केली त्यावेळी इंडियन मुजाहिद्दीन सोबत तुलना करताना तुम्हाला लाज वाटली नाही. देशद्रोह्यांसोबत आमची तुलना करता आणि तुम्ही काय केले ते सांगायला आमचेच खासदार जगभर पाठवता.
- तुमच हिंदुत्व काय आहे हे भाजपला मला विचारायचे आहे. सिंदूर वाटणाऱ्या त्या भाजप नेत्याला चाबकाने फोडायला हवे. कर्नल कुरेशी यांना पाकिस्तानची बहीण म्हणतो. अशा अवलादी भाजपच्या आहेत.
- ट्रम्प फोन आल्यानंतर यांचा आवाज गेला. वॉर रुखवा दी पापा. चार अतिरेकी आत आले कसे? संरक्षण मंत्री, गृहमंत्री गेले कुठे? पातळात गेले, आकाशात गेले की भाजपमध्ये गेले? आता केवळ दाऊदला पक्षात घायच बाकी आहे. भाजपने जेलच्या बाहेर सदस्य नोंदणीसाठी स्टॉल टाकले आहेत
- आधी भ्रष्टचाराचे आरोप केले, एसआयटी लाऊ म्हणाले. आता कुठे गेली एसआयटी… एसटीत गेली की काय? विधानसभेला त्यांनी बटेंगे तो कटेंगे नारा दिला, हिंदू-मुस्लिम केलं. आता हिंदू-हिंदू मध्ये मारामाऱ्या होतील अशी परिस्थितीत यांनी केली आहे.
