उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज
ठाणे, दि. ३०: ठाणे महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून, महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाकडून महापौरपदासाठी शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपकडून उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेतील सत्तावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस होता. सकाळपासूनच ठाणे महापालिका मुख्यालयात राजकीय हालचालींना वेग आला होता. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांची सतत बैठका सुरू होत्या. अखेर दुपारी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते.
शिवसेनेकडून महापौरपदावर दावा कायम
उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या महिला नगरसेवकांची बैठक महापौर केबिनमध्ये पार पडली होती. या बैठकीत विमल भोईर, शर्मिला पिंपळोलकर आणि डॉ. दर्शन जानकर ही नावे चर्चेत होती. मात्र संख्याबळ आणि संघटनात्मक पाठिंब्याच्या आधारे शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला ७५ तर भाजपला २८ जागा मिळाल्या आहेत. या संख्याबळाच्या जोरावर महापौरपद पूर्ण कालावधीसाठी आपल्याकडेच ठेवण्याची भूमिका शिवसेनेकडून सुरुवातीपासूनच घेतली जात होती.
भाजपकडून उपमहापौरपद स्वीकार
महापौरपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भाजपकडून कृष्णा पाटील यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी देण्यात आली. उपमहापौरपदासोबतच भाजपने स्थायी समिती, परिवहन समिती, विषय समित्या, प्रभाग समित्या आणि शिक्षण मंडळावरही दावा कायम ठेवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, समित्यांच्या अध्यक्षपदांची विभागणी ठरावीक कालावधीसाठी दोन्ही पक्षांत केली जाण्याची शक्यता आहे.
निवड प्रक्रिया औपचारिक
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर पदासाठी औपचारिक निवड प्रक्रिया पार पडणार आहे. संख्याबळ लक्षात घेता, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. ठाणे महापालिकेतील सत्तास्थापनेनंतर पुढील काळात समित्यांची रचना आणि पदवाटपावरून पुन्हा राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
