थोर समाजसुधारक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अग्रणी नेतृत्व प्रबोधनकार ठाकरेंना मनसे प्रमुखांनी जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
मुंबई, दि. १७: काल मुंबईत झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी ठाकरे ब्रॅंड बाबत एक टिप्पणी केली जी दोन्ही ठाकरेंना झोंबणारी होती. यावर दोन्ही ठाकरेंकडून काय प्रतिक्रिया येते याची प्रतीक्षा होती जी आज सकाळी संपली. थोर समाजसुधारक व लेखक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज समाज माध्यमांवर एक पोस्ट केली आहे. ज्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाकडून केल्या जाणाऱ्या धार्मिक धृवीकरणाच्या राजकारणावर नाव न घेता अप्रत्यक्ष खरमरीत टीका केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना ‘ठाकरे ब्रॅंड’ नेमका काय आहे आणि का आहे याबाबत अवगत केलेलं दिसतंय इतकं नक्की. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत राज ठाकरे.
आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती… आजोबांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रं वापरून पुराणमतवाद्यांशी दोन हात केले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्रोत. यातूनच त्यांच्या समाजसुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि त्यानंतर आजोबांनी सामाजिक कार्याचा पाया घातलाच पण त्यात ढवळाढवळ करणाऱ्यांची पार दाणादाण उडवून दिली.
आज जेंव्हा एखाद्या कळकळीच्या विषयवार तरी भूमिका घ्या म्हणून साहित्यिक आणि कलाकारांना सांगावं लागतं, त्यावेळेस समाजसुधारणेची स्पष्ट भूमिका घेऊन अफाट साहित्य निर्माण करून वेळेस अंगावर येणाऱ्या सगळ्या पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणाऱ्या आमच्या आजोबांच कौतुक करावं तितकं कमी आहे.संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं त्यांचं योगदान अतुलनीय आहे. ही अशी एक चळवळ होती ज्यात संपूर्ण महाराष्ट्राची एकजूट दिसली, ती पक्षविरहित होती, विचारधारा विरहित होती, या सगळ्या शक्तींना एकत्र ठेवण्याचं काम आजोबांनी केलं.आजोबांचं एक पुस्तक आहे त्यांचं नाव आहे ‘देवांचा धर्म की धर्माची देवळे’… आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली, उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे, त्याला पण आर्थिक महत्वकांक्षेच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहून, धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते.असो. पण आम्हा सर्व ठाकरे परिवाराला ओळख , ताकद, आणि विचारांची स्पष्टता मिळाली ती निव्वळ आजोबांमुळेच.आजोबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
तळटीप :- हा माझा आजोबांसोबतचा फोटो.
