“अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक” – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. ०५ : प्रशासन काळानुरूप बदल स्वीकारणारे असेल तर लोकांना अधिक गतिमान, पारदर्शक व चांगल्या सेवा मिळू शकतात. सामान्य प्रशासन विभागाने आयोजित केलेला ‘टेक वारी’: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ हा उपक्रम राज्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशासकीय क्षमता विस्तारण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आपण बदलांचा केवळ स्वीकार करत नसून बदलाचे नेतृत्व करत असल्याचा संदेश ‘टेक वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून जाईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ५ ते ९ मे दरम्यान टेक वारी अंतर्गत हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपाल दास यांच्या मार्गदर्शनाचा फायदा सर्वांनाच होईल. ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज्, सायबर सुरक्षा, डिजिटल फायनान्स ‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचे परिवर्तन’ ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’, विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक’ अशा क्षेत्रातील तज्ज्ञ विविध मार्गदर्शन सत्रांद्वारे हे विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहेत. काळानुरूप बदल सगळ्यांनी स्वीकारून प्रशासन अधिक गतिमान करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, टेक-वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, संगीत थेरपी, ध्यानधारणा, कार्य-जीवन समतोल या विषयांवरील मार्गदर्शन सत्रे आयोजित केली आहेत. यामुळे संतुलित व सुदृढ शासकीय कर्मचारी वर्ग घडविण्यास मदत होईल.
