तुम्हाला ठाऊक आहे ‘शिक्षक दिन’ का साजरा केला जातो ?
मुंबई, दि. ५: देशभरात आज ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा केला जात आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घालणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.
हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ज्ञान, विचारशक्ती आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करणारे डॉ. राधाकृष्णन हे केवळ एक विद्वानच नव्हे तर प्रेरणादायी शिक्षक म्हणून जगभरात ओळखले जात होते. त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून १९६२ पासून देशभरात शिक्षक दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
आजच्या दिवशी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांचा गौरव करण्यात येतो. विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणं, नृत्य-गीतांच्या माध्यमातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. अनेक ठिकाणी निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात येतो तर आदर्श शिक्षक पुरस्कारही प्रदान केले जातात.
शिक्षक हा केवळ विषय ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनात योग्य मूल्ये, नैतिकता आणि जीवन कौशल्यांचा पाया घालणारा असतो. आधुनिक युगात तंत्रज्ञानाची वाटचाल वेगवान झाली असली तरी ‘गुरु-शिष्य परंपरा’ आजही तेवढ्याच श्रद्धेने जोपासली जाते. देशाच्या विकासाचा कणा म्हणजे शिक्षण आणि त्या शिक्षणाची पायाभरणी शिक्षक करत असतात. म्हणूनच आजचा दिवस शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष मानला जातो.
