सुब्रमण्यम स्वामी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला; शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण
मुंबई: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए ने विक्रमी ३५० जागांवर विजय प्राप्त केला. महाराष्ट्रात शिवसेना या आपल्या जुन्या मित्राबरोबरीने भाजप ने नव्याने निवडणूक पूर्व युती केली. पण आता सत्ता स्थापन झाल्यानंतर केंद्रात मंत्रिपद देताना भाजप नेतृत्वाने हात आखडता घेतला आहे. त्यामुळे शिवसेना थोडी खट्टू झाल्याचे जाणवते.
नेमकं याच वेळी भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी हे मातोश्री भेटीवर आले होते. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे स्वामींनी माध्यमांना सांगितले. सुब्रमण्यम स्वामी आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. वेळेला ते स्वपक्षावरही तोफ डागायला मागेपुढे पाहत नाहीत. काँग्रेस व गांधी परिवाराला कोर्टात खेचण्याची किमया त्यांनी करून दाखवली आहे. पण या बदल्यात दुसऱ्यांदा मोदी सरकार निवडून आल्यावरही त्यांना एकही केंद्रीय मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचे कळते. त्यांच्या अनुभवाचा फायदा नरेंद्र मोदींनी करून घ्यावा असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. आज शिवसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीमूळे एकाअर्थी वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. उद्या दि. १९ जुन रोजी शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. या सोहळ्यात सुब्रमण्यम स्वामी राममंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यताही नाकारता येत नाहीत. सुब्रमण्यम स्वामी हे राजकीय वर्तुळात आपल्या भूमिकांनी चकित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच भविष्यात नरेंद्र मोदींविरुद्ध सुब्रमण्यम स्वामींनी काही सणसणी आरोप केले तर त्यात आश्चर्य वाटायला नको.
