स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विशेष कार्यशाळेतून नवी मुंबई महानगरपालिकेत स्वच्छतेविषयी क्षमता बांधणी
नवी मुंबई, दि. १४: स्वच्छ भारत मिशन (नागरी) २.० अंतर्गत कचरामुक्त शहरांसाठी राष्ट्रीय क्षमता बांधणी आराखडा तयार करण्यात आलेला असून त्या अंतर्गत सर्व स्तरातील शासकीय संस्थांमध्ये अधिकारी, कर्मचारी यांची स्वच्छतेविषयी क्षमता बांधणी करण्यात येत आहे. त्यानुसार केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने देशभरात प्रशिक्षण देण्यासाठी २३ स्वच्छता नॉलेज पार्टनर्सची नेमणूक केलेली आहे. त्यांच्यामार्फत देशभरात ठिकठिकाणी प्रशिक्षण कार्यशाळा राबविण्यात येत आहेत.
अशीच कार्यशाळा स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांच्या निर्देशानुसार, स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत जागतिक महिला दिन सप्ताहातील विविध उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेली होती. ज्ञानकेंद्रामध्ये यशस्वी रितीने संपन्न झालेल्या या महिला सफाई कर्मचारी क्षमता बांधणी व कौशल्य विकास कार्यशाळेमध्ये २५० हून अधिक महिला स्वच्छता कर्मचा-यांसह संबंधित अधिकारी, तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले होते.
हिमालयन इन्स्टिट्युट फॉर एन्व्हायरमेंट, इकोलॉजी अँड डेव्हलमेंट या स्वच्छता नॉलेज पार्टनर संस्थेच्या वतीने ऑरनेट टेक्नॉलॉजिसच्या सहयोगाने आयोजित या स्वच्छता विषयक क्षमता बांधणी कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापन विषयातील अनुभवी व्यक्तिमत्व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सेवानिवृत्त विशेष कार्य अधिकारी आनंद जगताप तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रशिक्षक तिक्षला गायकवाड यांनी उपस्थितांना सादरीकरणासह मार्गदर्शन केले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेप्रसंगी उपआयुक्त डॉ.अजय गडदे तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर यांनी उपस्थित राहून या कार्यशाळेचे महत्व अधोरेखित केले.
